कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत

 सबलीकरण व स्वाभिमान योजना
सबलीकरण व स्वाभिमान योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेच्या लाभासाठी अर्ज करावेत

सोलापूर दि. 03

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजूर कुटुंबांना २ एकर बागायत किंवा ४ एकर जिराईत जमीन १०० टक्के अनुदान स्वरूपात देण्यात येत आहे. जिल्ह्यात या योजनेकरिता ज्या शेतकऱ्यांना शेती  विकायची आहे अशा इच्छुक मालकांनी तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केली आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांचे उत्पन्नाचे साधन वाढावे व त्यांच्या राहणीमानात बदल व्हावा तसेच त्यांना कायमस्वरूपी उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील भूमिहीन शेतमजुरांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असून, या योजनेतर्गंत चार एकर जिरायत शेतजमीन खरेदीकरीता प्रती एकर रु.5 लाख व दोन एकर बागायत जमीनीकरीता प्रती एकर रु.8 लाख कमाल मर्यादा आहे.

या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांचे वय 18 ते 60 वर्षे इतके असावे. दारिद्रय रेषेखालील भूमीहीन अनुसूचित जाती तथा नवबौध्द प्रवर्गातील परित्यक्ता स्त्रिया, विधवा स्त्रिया तसेच अनुसूचित जाती जमाती कायाद्यांतर्गत अनुसूचित जातीचे अत्याचारग्रस्त यांना प्राधान्य देण्यात येईल. महसूल विभागाने गायरान व सिलिंगच्या जमीनीचे वाटप केलेल्या कुटुंबांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही.जमीनीचे वाटप झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांने स्वत: जमीन कसणे आवश्यक असून सदर जमीनीचे विक्री करता येणार नाही. तसेच भाडेपट्ट्याने देता येणार नाही.

सदर योजनेंतर्गत जमीन विक्रीसाठी संबंधित जमीन मालकांनी विहीत नमुन्यातील जमीन विक्री अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. शेतजमीन विना बोजा व कुळ नसलेली असावी. जमीन कोठेही गहाण अथवा वादग्रस्त नसावी. शेतजमीन विक्री करणाऱ्या जमीन मालकाशिवाय संबंधिताच्या कुटुंबातील दोन व्यक्तींची ना-हरकत प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. शेतजमीन चांगल्या प्रतीची असावी. कसण्यास आयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदीपात्राजवळची क्षारयुक्त व क्षारपड जमीन असू नये.

     या योजनेतर्गंत जमीन विक्रीसाठी ईच्छुक जमीन मालकांनी शासन निर्णयात नमूद अटी व शर्तींची पुर्तता करून विहित नमुन्यातील परिपुर्ण जमीन विक्री प्रस्ताव दाखल करावेत तसेच सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पात्र लाभार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज कार्यालयाकडे दाखल करावेत असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त नागनाथ चौगुले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *