प्रधानमंत्री नरेंद्र मोदी रे नगर च्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे वाटप करणार
३० हजार असंघटीत कामगारांच्या स्वप्नातील घरांचा भव्य हस्तांतरण सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन | कॉ. नरसय्या आडम मास्तर यांचे आवाहन
सोलापूर दिनांक 17 (Sachinkumar Jadhav)
सोलापूर नगरी ही स्वातंत्र्यसंग्राम आणि क्रांतिकारी चळवळीची भूमी आहे. या मातीतल्या माणसांनी बहुआयामी कार्य करून सोलापूरच्या वैभवात भर टाकले. जगाच्या पाठीवर सोलापूर नगरी चे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी घेतले जाते. मार्शल लॉ आणि सोलापूर कम्यून, वैशिष्ट्यपूर्ण चादरींचे उत्पादन, आता घरकुलांची नगरी ही नवी ओळख निर्माण झाली ती इथल्या लढाऊ श्रमिकांनी संघर्षातून मिळवलेल्या स्वप्नातील घरांमुळे. हा विक्रम आपल्या सोलापूर साठी भूषणावह आहे. यात अत्यंत आनंददायी गोष्ट अशी की, सोलापुरातील ३० हजार असंघटीत कामगारांचे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत शहरी भागातील नागरीकांसाठी परवडणाऱ्या दरात, सहकार तत्वावर एकाच छताखाली पथदर्शी, महत्त्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्प रे नगर !
२८ जून २०१३ रोजी रे नगर फेडरेशन ची स्थापना करण्यात आली. ९ डिसेंबर २०१५ रोजी सर्वांसाठी घरे २०२२ ही योजना केंद्र सरकारने जाहीर केली. २ जुलै २०१६ रोजी रे नगर फेडरेशन गृहनिर्माण प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. त्यानंतर केंद्र व राज्य सरकार आणि म्हाडा आणि रे नगर फेडरेशन यांच्यात समन्वय होऊन प्रकल्प कामाला गती प्राप्त झाली. ४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रकल्पास अंतिम मंजुरी मिळाली. प्रकल्प उभारणी साठी लागणाऱ्या निधीची तरतूद करून पूर्तता करण्यात आली. ९ जानेवारी २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते प्रकल्पाचा पायाभरणी व भूमिपूजन सोहळा पार पडला.
या प्रकल्पाअंतर्गत रे नगर येथे अंतर्गत रस्ते, पथदिवे, मलनिस्सारण व्यवस्था, मुबलक पाणीपुरवठा, वीज, अंगणवाडी, शाळा, महाविद्यालय, क्रीडांगण, बाजार पेठ, उद्यान, भाजी मंडई, प्रार्थनास्थळ, अभ्यासिका, मंगल कार्यालय, सभागृह, स्मशानभूमी, पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी वृक्षारोपण अशा विविध नागरी सुविधांचे काम युद्ध पातळीवर चालू आहे. साधारणतः २ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आजमितीस केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान प्राप्त झाले.
रे नगर च्या पहिल्या टप्प्यातील १५ हजार घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे श्रमिकांच्या स्वप्नातील घरांची चावी देण्यासाठी शुक्रवारी सोलापूर ला येत आहेत.
अभिमानाची बाब आहे. हा स्वप्नपूर्ती सोहळा सोलापूरच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल या सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थिती लावावी असं आवाहन रे नगर चे संस्थापक, मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केलं.