Talathi Exam | शुक्रवारी नांदेड शहरातील अनेक केंद्रावर तलाठी भरतीसाठी टीसीएसकडून परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. परंतु विष्णूपुरी येथील सहयोग कॅम्पस या परिक्षा केंद्रावर उडालेल्या गोंधळामुळे अनेक भावी तलाठ्यांना परिक्षेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून तलाठी भरतीची परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा हिरमोड झाला.
नांदेड : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षापासून विविध पदाच्या भरतीच्या प्रतिक्षेत विद्यार्थी होते. त्यात शासनाने आता एकदाची भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात शुक्रवारी तलाठी पदासाठी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा तसेच बाहेर जिल्ह्यातून हजारो विद्यार्थी नांदेडात दाखल झाले होते. मात्र शहरातील सहयोग कॅम्पस येथील परिक्षा केंद्रावर गोंधळ उडाला. आधार कार्ड, हॉल तिकीटची रंगीत झेरॉक्स, फोटो यासह इतर कागदपत्रासाठी विद्यार्थ्यांना परत झेरॉक्स सेंटरवर पाठविण्यात आले. तर काहींना किरकोळ कारणावरुन परिक्षा केंद्राबाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. कागदपत्रे तपासणी आणि इतर प्रक्रियांमध्ये वेळ अधिक गेल्याने प्रवेशद्वारापर्यंत पोहचेपर्यंत परिक्षेची वेळ झाली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना बाहेरच रोखण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. त्यांनी वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परिक्षा घेण्याची मागणी केली आहे.
आणखी किती वर्ष वाट पाहायची
परिक्षेसाठी एक तासापूर्वीच केंद्रावर आलो होतो. परंतु कलर झेरॉक्स नसल्यामुळे ती काढण्यासाठी परत पाठविण्यात आले. आधार कार्ड सत्यप्रत नसल्यामुळे प्रवेश नाकारण्यात आला. अनेक वर्षानंतर यंदा परिक्षा होत आहे. परंतु त्यापासूनही वंचित राहिलो. आता आणखी किती वर्ष परिक्षेसाठी वाट पाहावी लागणार माहिती नाही.
– मनज्योतसिंग मल्ली, परिक्षार्थी
Nanded Talathi Exam| बॅगेसाठी २० तर पार्कींगला १० रुपये
सहयोग कॅम्पसमध्ये परिक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना दुचाकी पार्क करण्यासाठी दहा रुपये शुल्क आकारण्यात आले. तर बॅग ठेवण्यासाठी २० रुपये वसूल केले. येथे बॅग ठेवण्यासाठीही मोठी रांग असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बराचसा वेळ त्यात गेला. अशाप्रकारे विद्यार्थ्यांची या ठिकाणी लूट सुरु असल्याबाबत संताप व्यक्त करण्यात आला.
Nanded Talathi Exam| कागदपत्रे तपासणीतच वेळ घातला
माझ्याकडे साधी झेरॉक्स होती. तर कलर काढून आणण्यास सांगितले. तसेच परत फोटोही काढून आणायला लावले. कागदपत्रांची पूर्तता करण्यातच अधिक वेळ गेला. त्यानंतर गेट बंद करण्यात आले. परिक्षेसाठी लोहा येथून पहाटे 6 वाजता निघूनही परिक्षेसाठी वंचित रहावे लागले.
– ईश्वर राठोड, परिक्षार्थी.