Prohibition of sale of liquor in election areas
ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात मद्य विक्री मनाई आदेश जारी
सोलापूर :-जिल्ह्यातील माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायती तसेच पोटनिवडणूकीसाठी मतदान दि. 05 नोंव्हेबर 2023 रोजी तर मतमोजणी दि.06 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मतदान असणा-या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी व मतमोजणी होत असलेल्या ठिकाणी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जारी केले आहेत.
राज्य निवडणुक आयोगाने माहे जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणा-या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित व सन 2022 मध्ये चुकीची प्रभागरचना झाल्यामुळे निवडणुका न होऊ शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक संगणकप्रणालीव्दारे तसेच ग्रामपंचायत रिक्त कामांच्या पोटनिवडणूकीसाठी पारंपारिक पध्दतीने राबविण्यात यावायचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अक्कलकोट, बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढा, सांगोला, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर तालुक्यांतील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक व पोटनिवडणूकीसाठी दि. 05 नोंव्हेबर 2023 रोजी मतदान होणार आहे.
निवडणुकीच्या अनुषंगाने शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असणा-या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या दिनांक 3 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6.00 वाजलेपासून, दिनांक 4 नोव्हेंबर 2023 रोजी संपूर्ण दिवस व दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यत बंद राहतील. तसेच दि. 6 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होत असलेल्या मुख्यालयाच्या ठिकणी असणाऱ्या सर्व मद्यविक्री अनुज्ञप्त्या मतमोजणी संपेपर्यंत बंद राहतील.असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.