पर्यावरणाच्या समतोलासाठी जनजागृती महत्त्वाची | Dy.CM DENENDRA FADNAVIS
कार्तिकी वारी पंढरीच्या दारी, पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी’ या उपक्रमाचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन
पंढरपूर, दिनांक 22:- वातावरणात झालेल्या बदलामुळे पर्यावरणाचा नाश होत असून अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. अतिवृष्टी, अवेळी पडणारा पाऊस त्यातून शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे, त्याप्रमाणेच शहरी भागातही पाणी साचत असल्याने अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा संदेश देण्यात येतो. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पर्यावरण विभागाच्या वतीने आयोजित कार्तिकी वारी पंढरीच्या दारी शिक्षणाचे धडे देईल घरोघरी या उपक्रमाचे उद्घाटन प्रसंगी उपमुख्यमंत्री फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, राम सातपुते, सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार प्रशांत परिचारक, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले की पर्यावरण विभागाच्या वतीने आषाढी व कार्तिकी वारीमध्ये पर्यावरण जनजागृतीचा अत्यंत चांगला उपक्रम राबविला जात असून यातून तरुण वर्ग, विद्यार्थी व समाजातील अनेक घटकापर्यंत पर्यावरण जनजागृतीचा संदेश पोहोचवला जात आहे. आपल्या संतांनी ही पर्यावरणाचे महत्त्व विशद केलेले आहे. संत ज्ञानेश्वर माऊली पासून ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजापर्यंत सर्वांनी व्यक्ती सोबतच निसर्गाचा व पर्यावरणाचा विचार मांडलेले आहेत. निसर्गाचा घडलेला समतोल व्यवस्थित होण्यासाठी पर्यावरण जागृती सारखे उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. तसेच पर्यावरण संवर्धनाचे शिक्षण शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
प्रारंभी पर्यावरणाच्या दिंडीने हरिनामाचा गजर करत त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील , आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भजनाचा टाळ वाजवत ठेका धरला. याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक व पालकमंत्री यांच्या सोबत फडणवीस यांनीही फुगडी खेळली. आणि ज्ञानोबा तुकाराम , जय जय राम कृष्ण हरी असा गजर करत वारकरी भक्तांसोबत दंग झालेले पाहायला मिळाले.
यावेळी ह.भ.प पुर्वा काणे , संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाताई तिवाडी, झी मराठी फेम शाहिर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी झाले होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, आयोजित
“कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी ” या उपक्रमाची संकल्पना
पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभिमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीप्रमाणे कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत आहे.
या कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा, विजेची बचत (सिएफएल बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन करा, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करुन शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करुन ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते. वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत आहे.