महात्मा बसवेश्वर प्रतिमा अनुचित प्रकाराची पोलिसांकडून सखोल चौकशी नागरिकांनी शांतता पाळावी |DM जिल्हाधिकारी
जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी शांतता पाळावी, DM जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन
सोलापूर, दिनांक 18 :-
श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर दुसऱ्या दिवशीच्या यात्रा दि .15 जानेवारी 2024 रोजीच्या होम व भाकणूक मिरवणूकीप्रसंगी बैलगाडीच्या रथात श्री शिवयोगी सिध्दरामेश्वर व महात्मा बसवेश्वर महाराज यांचे प्रतिमा ठेवून मिरवणूक निघालेली होती. त्या मिरवणूकीमध्ये अज्ञात समाजकंटकाने महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पेपर लावून झाकून ठेवण्यात आले. जसे मिरवणूक पुढे पुढे जात होते. त्या दरम्यान बसवेश्वरांचे प्रतिमा मिरवणूकीमधून काढून टाकण्यात आली. या प्रकरणी मंदीर पंच कमिटीकडे विचारणा केली असता, याबाबत आम्हाला कोणतीच माहिती नाही, असे सांगण्यात आले, असे निवेदन राष्ट्रीय लिंगायत महासंघ भारत संघटनेकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहे.
उपरोक्त घटनेमुळे लिंगायत समाजामध्ये रोष निर्माण झालेला आहे. तरी असे कृत्य करणाऱ्या सर्व संबंधिताची पोलीस विभाग सखोल चौकशी करेल व संबंधिता विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. तरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी शांतता पाळावी असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
सोलापूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा असून जिल्ह्यात आज पर्यंत सर्व सण, उत्सव, समारंभ व मिरवणुका अत्यंत शांततामय वातावरणात पार पडत असतात, याही पुढे असेच शांततामय वातावरण रहावे, असे आवाहन सर्व समाजातील नागरिकांना करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.