वस्तुनिष्ठ इतिहास अभ्यासण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजेचे | माया पाटील
मोडी लिपी प्रचार व प्रसार कार्यशाळा संपन्न
सोलापूर दिनांक 18 (Sachinkumar Jadhav)
मोडी लिपीच्या अभ्यासातून इतिहासाची अनेक भाषिक साधने आपल्याला अभ्यासता येणे शक्य आहे. चित्र, शिलालेख, ताम्रपट आणि शिल्पकलेच्या माध्यमातूनही इतिहास पाहता, शिकता येतो. या सर्व साधनांचा अतिशय गांभिर्यपूर्वक अभ्यास करण्यासाठी मोडी लिपी शिकणे गरजचे आहे. असे प्रतिपादन प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती आणि पुरातत्वशास्त्र विभाग प्रमुख डॉ. माया पाटील यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि पुराभिलेख संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या मोडी लिपी प्रचार व प्रसार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ. माया पाटील बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर, पुराभिलेख संचालनालयाचे अभिलेखाधिकारी मनोज राजपूत, अभिलेखाधिकारी गणेश खोडके, अमोल महल्ले उपस्थित होते.
यावेळी डॉ. माया पाटील म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मोडी लिपीचा वापर राजलिपी म्हणून केला होता. शिवपूर्वकाळात मोडीचा वापर झाला होता आणि शिवकाळानंतरही मोडीचा वापर सुरू होता. सध्या वस्तुनिष्ठ इतिहास सामोरा येण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त अधिकृत व विश्वासार्ह साधनेही मोडी लिपीत उपलब्ध आहेत.त्यासाठी मोडी लिपी शिकणे ही काळाची गरज निर्माण झाल्याचे स्पष्ट केले. यावेळी पुराभिलेख संचालनालयाचे अभिलेखाधिकारी मनोज राजपूत म्हणाले, महसूल खात्यातील जुनी कागदपत्रे, कोर्टातील आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे, इतिहासातील महत्वाच्या घटनांची कागदपत्रे मोडीलिपीत जतन केलेली असून आज मात्र समाजात मोडी वाचन करणार्यांची फार मोठी वानवा आहे. ही उणीव थोडीशी का होईना दूर करण्याच्या हेतूने शासन आणि विद्यापीठाच्या वतीने सदर प्रशिक्षण हाती घेतले असल्याचे सांगीतले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यशाळेचे समन्वयक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. डॉ. कोळेकर यांनी महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीमध्ये मोडी लिपीचे महत्व स्पष्ट करुन मोडी लिपी शिकणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. मोडी लिपी प्रचार व प्रसार कार्यशाळेसाठी 220 विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक, कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यशाळेत दिवसभर पुराभिलेख संचालनालयाचे अभिलेखाधिकारी मनोज राजपूत, अभिलेखाधिकारी गणेश खोडके, अमोल महल्ले यांनी मोडी लिपी लिहण्याचे आणि वाचणाचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेचे सुत्रसंचलन डॉ. तेजस्विनी कांबळे केले तर आभार डॉ. सुनिता गाजरे-पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी डॉ. अंबादास भास्के, डॉ. ज्ञानेश्वरी हजारे, डॉ. रुपेश पवार, डॉ. सचिन शिंदे, चेतन मोरे, ऋषिकेश मंडलिक, विठ्ठल एडके, हर्षल शिंगे, डॉ. श्रीनिवास भंडारे, राम भोसले, विष्णु खडाखडे, रविराज शिंदे, भैरव भुसारे, सोमलिंग वडरे, राजेश पाटील आदींनी कार्यशाळेसाठी परिश्रम घेतले.