Election विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा | विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

विभागीय आयुक्त पुणे
विभागीय आयुक्त पुणे 

 

 

 

 

 

 

Election विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या उपाययोजना करा | विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार

पुणे, दि. 26 [ Sachinkumar Jadhav ]

महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने परस्पर समन्वयाद्वारे निवडणुकीच्या विविध टप्प्यांवर सुरक्षेच्या आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि निवडणुका मुक्त आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठीचे नियोजन करावे, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित पुणे विभागाच्या निवडणूक आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे, सह पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, महसूल उपायुक्त वर्षा लड्डा-उंटवाल, शिरुर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे आदी उपस्थित होते.

डॉ.पुलकुंडवार म्हणाले, आदर्श आचारसंहिता आणि भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन होईल याकडे विशेष लक्ष द्यावे. त्यासाठी निवडणूक आराखडा योग्यरितीने तयार करावा आणि त्यात सूक्ष्म बाबींचाही समावेश असावा. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य समन्वयासाठीदेखील योग्य नियोजन करावे. पैशाचा आणि बळाचा वापर होऊ नये आणि नागरिकांना निर्भयपणे मतदान करता येईल यादृष्टीने प्रतिबंधक उपाययोजना कराव्यात.

युवक आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहीत करावे. पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासोबत मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधण्याविषयी व्यापक जनजागृती करावी. उन्हाळ्यातील वाढते तापमान लक्षात घेता सकाळी आणि सायंकाळी दोन तास मतदानासाठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आवश्यक व्यवस्था करावी. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मतदान कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घ्याव्यात, असे निर्देशही विभागी आयुक्तांनी दिले.

यावेळी पुणे विभागातील जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे आपल्या जिल्ह्यातील निवडणूक तयारीची माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रतिबंधात्मक कार्यवाहीवर विशेष लक्ष देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

विभागीय आयुक्त पुणे
विभागीय आयुक्त पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *