Movement of the Koli tribe | कोळी समाजाचे आमरण उपोषण

अन्यथा शासनाला व विरोधकांनाही झेपणार नाही असे तीव्र आंदोलन राज्यभर करू –  गणेश अंकूशराव

गणेश अंकुशराव, पंढरपूर
गणेश अंकुशराव, पंढरपूर

पंढरपुर (प्रतिनिधी) : गेल्या 18 दिवसांपासुन जातीच्या दाखल्यासाठी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेल्या आदिवासी कोळी जमात बांधवांच्या आंदोलनस्थळी अद्याप एकही राजकीय नेता भेट देण्यास आला नाही, यावर आदिवासी कोळी बांधवांमधुन तीव्र संताप व्यक्त होत असुन पंढरपुरातील महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष यांनी याबाबत नाराजी व्यक्त करत, ‘आज राज्यात मराठा समाजासह अनेक समाज आरक्षणाच्या मागणीसाठी विविध प्रकारची आंदोलनं करत आहे, या सर्व ठिकाणी विविध पक्षाचे राजकीय नेते मंडळी भेट देत आहेत, परंतु आमच्या आदिवासी महादेव कोळी, टोकरे कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी समाजातील समाजबांधव गेल्या 18 दिवसांपासुन आमरण उपोषणाला बसलेले आहेत, याठिकाणी अद्याप एकही राजकीय नेता फिरकलेला नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उध्दव ठाकरे, मनसे नेते राज ठाकरे, विरोधी पक्ष नेते विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते? असा खडा सवाल यावेळी गणेश अंकुशराव यांनी उपस्थित केलाय.

 

सत्ताधार्‍यांसह विरोधीपक्ष नेते हे केवळ मतांचा आकडा बघून राजकारण करताना आढळत आहेत, आमची बाजु सत्याची असुन आम्हाला न्याय मिळत नाही, आमच्या मागण्यांचा विचार केला जात नाही, आमच्या आंदोलनांचीदखल घेतली जात नाही, आमच्या जळगाव मधील आंदोलनकर्त्यांची तब्येत ढासळत आहे, तरी सुध्दा इकडे नेत्यांनी पाठ फिरवलेली आहे, हेच का तुमचे राजकारण? हीच का तुमची समाजसेवा? हीच का तुमची संविधानाबद्दलची निष्ठा? जात बघुन आंदोलनकर्त्यांकडे जायचे की नाही हे ठरवणारे तुम्ही एक लक्षात घ्या, आमचा फक्त मतासाठी वापर करुन घेत आहात हे आमच्या जमात बांधवांच्या पक्के लक्षात आलेले आहे, आत्ता यापुढे आमच्या जमात बांधवांकडून तुम्हाला योग्य वेळी योग्य जागा दाखवुन दिली जाईल! आमच्या जमातीतील मतदार हा महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदार संघात निर्णायक ठरणारा मतदार आहे, आमच्या जमातीचे हीत बघणारांनाच आम्ही आमचे अनमोल मत यापुढे देऊ आणि आमच्याकडे पाठ फिरवणारांना घरी बसवु, असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलाय.

एकनाथ शिंदे, शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, विजयकुमार वडेट्टीवार कुठे आहेत हे नेते? आदिवासी कोळी जमातीच्या आंदोलनाकडे पाठ फिरवणार्‍या नेत्याला समाजाचा खडा सवाल? …अन्यथा शासनाला व विरोधकांनाही झेपणार नाही असे तीव्र आंदोलन राज्यभर करू!- गणेश अंकूशराव

 

जळगावमध्ये सध्या आदिवासी कोळी बांधवांचे सुरु असलेले उपोषणस्थळी भेट न देणार्‍या राजकीय नेत्यांचा उद्या महर्षी वाल्मिकी जयंतीच्या दिवशी आदिवासी कोळी जमात बांधवांकडून राज्यात ठिकठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करावा आणि स्वत:ला मोठे समजणार्‍या परंतु मनानं छोटे असलेल्या या जातीयवादी नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवून द्यावी, असा संदेश यावेळी गणेश अंकुशराव यांनी समाजबांधवांना दिलाय तसेच जर आमच्या आंदोलनकर्त्या बांधवांच्या जीवाचे कांही बरे वाईट झाले तर सरकारला आणि विरोधकांनाही झेपणार नाही, असे तीव्र आंदोलन महाराष्ट्रात ठिकठिकाणी करण्यात येईल असा इशाराही यावेळी गणेश अंकुशराव यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *