Solapur biomedical waste scandal 

Solapur biomedical waste scandal

सोलापुरातील तथाकथित बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याची जिल्हाधिकारी  पुढील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी लावली बैठक.*

सोलापूर: जानेवारी २०२४ महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याबाबत पुरावे व फोटो सहीत डॉ. संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी व प्रभारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे दि. २८ जून २०२४ रोजी सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी, मक्तेदार एस एस सर्विसेस व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढील आठवड्यात बैठक लावलेली आहे.

सोलापूर महानगरपालिकेतील तत्कालीन उपायुक्त विद्या पोळ यांनी टेंडर प्रक्रियेचे सर्व निकष व नियम धाब्यावर बसून ५ जानेवारी रोजी एस एस सर्विसेस कोल्हापूर या कंपनीस सोलापूर जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट संकलन, वाहन व प्रक्रिया करण्याची निविदा दिली. या निवीदे मध्ये तब्बल १६ त्रुटी असल्याचे याआधीचे मक्तेदार बायोक्लिन सिस्टीम त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना कळवलेले आहे. नवीन मक्तेदाराकडे आजपर्यंत कचरा संकलन, वाहन व नष्ट करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही लायसन्स नाही. परंतु महानगरपालिकेतील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी या मक्तेदारास फक्त नोटिसा पाठवण्याशिवाय काहीही केले नाही. तसेच दि.२७ फेब्रुवारी रोजी आयुक्तांसमवेत मक्तेदारांच्या झालेल्या बैठकीचा वृत्तांत एस एस सर्विसेसच्या बाजूने बदलून फेर वृत्तांत दाखल केला आहे व विशेष म्हणजे या दोन्हीही वृत्तांतवर आयुक्त तेली उगले यांच्या सह्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स व मेडिकल एस्टॅब्लिशमेंट यांना जवळपास आधीच्या मक्तेदारापेक्षाही चौपट दराने ही सेवा देण्याचे दर पत्रक लादण्यात आले. त्यामध्ये नव्याने पुन्हा नोंदणीकरण करण्यासाठी तीन ते पाच हजार जास्तीची रक्कम लावण्यात आली. फक्त सोलापूर शहरातीलच अंदाजे ४०० हॉस्पिटलची ही रक्कम जवळपास १२ लाख रुपये पर्यंत जाते. याउपर कचरा वाहून नेण्यासाठी दरमहा ५०० ते ५००० रुपयांपर्यंत वेगळी रक्कम लादण्यात आली. या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५०० ते ५००० दरमहा अथवा ९ रुपये दर दिवस प्रत्येक बेड साठी आकारण्यात आलेले आहेत. त्यात पूर्वी देण्यात आलेला ३० टक्के डिस्काउंट हटवण्यात आलेला आहे. यास सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांनी विरोध केल्यानंतर अवैध पद्धतीने उपायुक्त (आरोग्य) आशिष लोकरे यांनी पुन्हा सुधारित दरपत्रक जाहीर केले. एकदा एखादी निविदा दिल्यानंतर असे सुधारित दर पत्रक कसे काय देता येते हे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळत नाही का? यातूनच या कचरा प्रकरणांमध्ये करोडो रुपयांची माया आहे व त्यात सोलापूर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्विसेसला पाठीशी घालून ही माया लाटण्यामध्ये कसे सक्रिय आहेत हे दिसून येते. या अधिकाऱ्यांनी एका बाजूला एस एस सर्विसेस ला नियमबाह्य पद्धतीने चौपट दराने मक्ता दिला. त्यात महानगरपालिकेची २४ टक्के रॉयल्टी ठेवली. खरे तर हा कचरा उचलणे व त्याची योग्य विल्हेवाट लावणे ही महानगरपालिकेची नैतिक जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा करून घेणे हे नैतिकतेला व नियमांना धरून नाही. हे सुधारित दरपत्रक सुद्धा डॉक्टरांनी अमान्य केल्यानंतर सर्व डॉक्टर्सना आपण जर ३१ एप्रिल पर्यंत नोंदणी करून घेतली नाही तर १ मे पासून आपला कचरा उचलला जाणार नाही अशी धमकीच आशिष लोकरे यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. या सर्व प्रकारातून महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी एस एस सर्विसेस ला पाठीशी घालून डॉक्टरांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांचा मलिदा लाटण्यामध्ये सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. ही गंभीर बाब सर्व पुराव्यानिशी अस्थिरोग तज्ञ डॉ. संदीप आडके यांनी काल जिल्हाधिकारी यांना सादर केलेली आहे व त्याचमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पुढील आठवड्यात याबाबत बैठक लावली आहे. यामुळे महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे व काही अधिकारी कामावर येत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबतीत सोलापुरातील डॉक्टरांनी मा. उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे असे असताना सुद्धा डॉक्टरांवर बैठकांसाठी बोलवणे व दबाव आणणे अशा चुकीच्या गोष्टी सुरू आहेत.

आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी समाजामध्ये अविरतपणे काम करणाऱ्या डॉक्टरांना लुटणे व दुसऱ्या बाजूला समाजातील सर्व नागरिकांची आरोग्याची जबाबदारी महानगरपालिका व त्यातील अधिकाऱ्यांवर असताना पैशाच्या लालचे पोटी असा भ्रष्टाचार करणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.

 

 

डॉ. संदीप आडके.

सोलापूर.

९८२२८०७००७.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *