सोलापूर : प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल घडवणाऱ्या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला 3 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 घरोघरी’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याचा शुभारंभ बुधवारी (26 जुलै) रोजी विद्यापीठात प्रभारी कुलगुरू राजनीश कामत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून केला.
यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे, कुलसचिव योगिनी घारे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सचिन गायकवाड, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण तिसऱ्या वर्षात पदार्पण करत असून त्यानिमित्त विद्यापीठ राबवत असलेल्या विविध योजनांचा हा कार्यक्रम आहे. विद्यार्थ्यांबरोबरच सामान्य नागरिक देखील याचा फायदा घेऊ शकतात. शहर व जिल्ह्यात ही दिंडी सर्वत्र जाईल. घरोघरी नवीन शैक्षणिक धोरणाचा प्रसार यानिमित्ताने होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. कांबळे यांनी विद्यापीठ आणि इनक्युबेशन सेंटरकडून हा कार्यक्रम संपूर्ण ताकतीने राबविण्यात येईल, अशी माहिती दिली. कुलसचिव योगिनी घारे यांनी या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले.
इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. सचिन लड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी जाणार आहे. या दिंडीचा लाभ घेण्यासाठी व माहितीकरिता ७०८०२०२०५५ आणि ७०८०२०२०५६ हे हेल्पलाईन नंबर विद्यापीठाने जारी केले आहेत. या दिंडीसाठी श्रीनिवास पाटील आणि श्रीनिवास नलगेशी हे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.