Women’s Empowerment Mission
मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियान
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती सोहळा पूर्वतयारीचा निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडून आढावा
संपादक:- सचिनकुमार जाधव 📞 📲 738 5352 309
सोलापूर दि. 13 – मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा कार्यक्रम माहे सप्टेंबर 2024 मध्ये नियोजित आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी प्रत्येक शासकीय यंत्रणेने हा सोहळा यशस्वी होण्यासाठी केलेल्या पूर्वतयारीचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या.
नियोजन भवन येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत पूर्वतयारी आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार बोलत होत्या. उपजिल्हाधिकारी तथा भूसंपादन अधिकारी संतोष देशमुख, जिल्हा कार्यक्रमाधिकारी प्रसाद मिरकले, सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, विशेष व गुन्हे पोलीस उपआयुक्त श्रीमती दिपाली काळे, सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गुजरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.आर.ठाकरे, तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्यासह अन्य सर्व संबंधित विभागाचे प्रमुख उपस्थित होते. तसेच सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ऑनलाईन द्वारे बैठकीत सहभागी झालेले होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी कुंभार यांनी बैठकीत बांधकाम विभागाकडून कार्यक्रम स्थळावर करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती जाणून घेतली. तसेच पार्कींग, वीज पाणी, साफसफाई याबाबतची महापालिकेकडून माहिती घेतली व आवश्यक सूचना दिल्या. सर्व विभागांनी सोपविलेली कामे वेळेत पूर्ण करावीत. कार्यक्रम स्थळी शासकीय विभागांनी समन्वय ठेवून नियोजनबध्द काम करावे.
पोलीस विभागाने कार्यक्रमाच्या दिवशी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन काटेकोरपणे करावे. वाहतुकीस कोठेही अडथळा निर्माण होणार नाही या अनुषंगाने पार्किंगची व्यवस्था ठेवावी. एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी महिला लाभार्थी घेऊन येणे व मेळावा झाल्यानंतर त्यांच्या ठिकाणी सोडणे यासाठी आवश्यक असलेल्या बसेसची पूर्तता करावी. पुरवठा विभागाने लाभार्थ्यांसाठी जेवणाची उत्कृष्ट व्यवस्था करण्याबरोबरच त्यांना कोणतीही अडचण येणार नाही याची ही दक्षता घ्यावी, असे त्यांनी सुचित केले.